गुरु साक्षात परब्रम्ह
गुरु साक्षात परब्रम्ह… सत्पुरुष जेथे जन्माला येत असतात तेथे त्याच्या पुर्वीच दैवी गुणसंपदा मांगल्याचे आणि पावित्र्याचे कलश डोईवर घेऊन पाणी भरत असते.अशा दैवी गुणसंपन्न कुलामध्ये महान शक्तिपातयोगी, सनातन हिंदू धर्माचे आधारस्तंभ आणि प्रभूश्रीरामचंद्राच्या निष्कलंक चारित्र्याची परंपरा आजच्या कलियुगामध्ये प्रवाहित ठेवणारे कारुण्यमुर्ती प.पू.श्रीनारायण काकामहाराजांचा जन्म पू.रमाबाई आणि पू.यशवंतराव या निष्पाप, निष्काम उभयतांचे पोटी ३ जुलै १९२७ रोजी धुळे ( महाराष्ट्र ) येथे देशस्थ ऋग्वेदी ब्राम्हण कुटुंबात झाला. वडील शाळामास्तर होते. कवी होते. रविकिरण मंडळाचे सभासद होते उत्कृष्ट बासरीवादक होते.धर्मरेषा न ओलांडणारे शिवपूजक होते. संघाचे सक्रिय सदस्य होते. वडीलांची संघनिष्ठा म्हणजे सर्वोदय, सर्वोत्कर्ष वृत्ती हीच पुढे श्रीकाकांचे जीवनध्येय बनून राहिली.आणि आई हिंदु स्त्रीमनाचे स्त्रीवात्सल्याचे मुर्तीमंत प्रतिक होती.तेच वात्सल्य पुढे श्रीकाकांचे ह्रदय व्यापून राहिले...!
श्रीकाकामहाराजांना आचाराचे बाळकडू प्रथमतः आईवडीलांकडूनच मिळाले.परंतु त्यांच्या शालेय
शिक्षणाचाही जडणघडणीत मोठा वाटा होता. पुण्यामध्ये नूतन मराठी विद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. तिथे
त्यांना गुळवणी मास्तर भेटले चित्रकलेचे. तेव्हापासुनचा त्यांचा गुळवणी मास्तरांशी ऋणानुबंध. शाळेत सर्व
विषयात ते पहिले असायचे आणि अर्थातच गुळवणी मास्तरांचे लाडकेही. ईश्वरी योजना आपल्या कल्पनेच्या
पलीकडील असते. श्रीगुळवणी महाराजांनी हे मनोमन जाणलेले असल्याने विनम्रता आणि तल्लख बुद्धी याद्वारे
विशेषत्वाने चमकणारा हा विद्यार्थी महाराजांच्या अंतःकरणात घर करुन बसला. कासवीचे आपल्या पिलांवर
लक्ष असावे तसे महाराजांनी बालपणापासून श्रीकाकांना आपल्या दिव्य नजरेने सांभाळले. याच धाग्याला धरुन
श्री काकामहाराजांनी ही श्रीगुळवणी महाराजांना कायम दादा..मोठे बंधु ..या नात्यानेच जपले आणि त्यांचा
प्रत्येक शब्द जीवनात उतरवुन दाखविला..!! आणि पुढे हे दोन्ही सत्पुरुष जगभर गुरुबंधु म्हणूनच प्रसिद्ध पावले
...जीवनात येणारी कुठलीच व्यक्ती विनाकारण येत नाही ..पाठीमागे शक्तीची लिला असतेच असते.!!
पुढे श्रीकाकामहाराज पुण्यातुन बी.ई.व कलकत्ता विद्यापीठातून सुवर्णपदकासह एम.ई. झाले. लौकीक
विद्येबरोबरच पूर्वसुकृताने ब्रम्हविद्यादेखील त्यांचे आयुष्यात अगदी तरुणपणीच प्रगट झाली. काँलेजमध्ये
शिकत असताना त्यांची भेट श्रीस्वामींबरोबर वयाच्या तेविसाव्या वर्षी झाली. श्रीकाकामहाराज श्रीस्वामींच्या
दर्शनासाठी व सेवेसाठी श्रीगुळवणी महाराजांकडे जात होते. परंतु दिक्षेचा योग काही येत नव्हता.आपले
जीवलग मित्र बाळासाहेब वाकडे यांचेद्वारे दिक्षेचा विषय काढला असता श्रीस्वामी म्हणाले ..अभी पढाई चालू
है ..बाद में देखा जाएगा... असे उत्तर मिळाले. परंतु पुढे स्वामीजीनी दोनच दिवसांनी शक्तीपात दिक्षा दिली
आणि १२ डिसेंबर १९५० ,मार्गशिर्ष शु. प्रतिपदेला देवदिपावलीच्या पावन पर्वावर श्रीकाकामहाराजांचा
कुंडलिनीच्या कैवल्यकुळात प्रवेश झाला..!
श्रीस्वामींच्याप्रती पूर्ण श्रद्धाभाव, श्रीगुळवणी महाराजांचे बरोबरचा अलौकीक सत्संग, श्रीदत्तमहाराजांचे
पुत्रवत प्रेम, दैवीगुणसंपन्नतेची अमोघ देणगी, संप्रदायाला धरुन असणारा आचारविचार ,परंपराप्राप्त दैवी धन
हे सर्वांसाठी लाभदायक व्हावे अशी ह्रदयाची तळमळ या सर्वांचा परिपाक असा झाला की श्री काकामहाराज
या महायोग परिवारात योगतपस्वी म्हणून प्रसिद्ध पावले ..!! एक योगिराज आणि एक योगतपस्वी ..!!
या
प्रकारचा दोन गुरुबंधुंच्या मध्ये असलेला प्रेमाचा धागा हा सर्व साधकांना आदर्शवत असा आहे.! श्रीमहाराज
ब्रम्हलीन झाल्यावर श्रीवासुदेव निवासची धुरा श्रीदत्तमहाराजांकडे आली. तिथेही काकामहाराज
श्रीदत्तमहाराजांशी ते प्रत्यक्ष दत्त आहेत..सद्गुरु आहेत..याच कृतज्ञभावाने आदर करत आले. विद्या विनयेन
शोभते याचे हे उत्तम उदाहरण.पुढे श्रीदत्तमहाराजांचे मार्गदर्शनाखाली त्यांना सर्व गोष्टी निवेदन करुन
श्रीकाकामहाराजांनी नाशिक येथे श्रीदत्तमहाराजांचे पवित्र करकमलाद्वारे श्रीस्वामींचे चरणाधिष्ठान स्थापन
केले . नाशिक आश्रमाची स्थापना झाल्यानंतर श्रीकाकामहाराज तेथील व्यवस्था पाहुन नित्यनेमाने पुण्याला
श्रीदत्तमहाराजांचे दर्शनाला व नाशिक आश्रमाचे कार्य कसे चालले आहे हे निवेदन करण्यासाठी येत असायचे.
विशेष म्हणजे हे निवेदन सुद्धा एक आचरणपाठ होता.निवेदन करताना एखादे लहान मूल वडिलांना जसे सर्व
आत्मनिवेदन करते तसा तो भाव असायचा! या अमानित्वाने श्रीकाकामहारांजानी जीवन कसे पवित्र बनविता
येते याचा वस्तुपाठच घालून दिलेला आहे !!
श्रीदत्तमहाराजांनी आपल्या पाठीमागे पुण्यातील आश्रमाचे उत्तराधिकारपद श्रीकाकांना देण्याचे निश्चित केले
होते. श्रीदत्तमहाराज स्वतः नाशिकला येऊन श्रीकाकांना तसे पत्र घेऊन आले. तिथेही श्रीकाकामहाराजांनी
स्वतः निर्णय न घेता श्रीमहाराजांचे समोर आईला विचारु लागले की महाराजांची अशी इच्छा आहे की
पुण्याचा आश्रम मी सांभाळावा.. तर काय करावे ? तर आईंनी थोडा विचार करुन सांगितले की महाराजांची
इच्छा म्हणजे आज्ञाच आहे तर काही हरकत नसावी परंतु ..नाशिकच्याही आश्रमाची धुराही सांभाळावी..!!
श्रीकाकामहाराजांनी श्रीदत्तमहाराजांकडे पाहिले ..आणि श्रीदत्तमहाराजांनी स्मितहास्य करत दोन्ही
आश्रमांसाठी होकार दिला..!! इथेही श्रीकाकांचे आतील आज्ञाधारक मुलं आईचा म्हणजेच जगदंबेचा कौल
घेऊनच जगताच्या कल्याणाचा विचार करु लागते ही एक नवलाचीच गोष्ट आहे.निसंगत्वाचा हा पाठ सर्व
साधकांसाठी आचरणपाठच आहे !!
श्रीदत्तमहाराज ब्रम्हलीन झाल्यानंतर श्रीकाकांनी पुणे- नाशिक असा प्रवास करत दोन्ही आश्रमांची जबाबदारी
सांभाळण्याबरोबरच कुंडलिनी योगाचा प्रचार प्रसार सर्व समाजात व्हावा म्हणून अनेक शहरात, खेड्यात,
विविध प्रांतात आणि जगभर आपल्या ओघवत्या व सोप्या भाषेत जाहीर प्रवचने द्यायला सुरुवात केली
.जगातील प्रत्येक माणसाला मार्गाची माहिती मिळावी अशी त्यांची तळमळ होती.
प.पू.श्रीकाकामहाराजांनी श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे अक्षर वाड्मय नव्याने प्रकाशित
करण्याचा उपक्रम राबवून व सर्वदूर श्रीस्वामींच्या दत्तसेवेचा मार्ग केवळ पोथीनिष्ठ न राहता तो सनातन
आचारनिष्ठ व्हावा म्हणून श्रीदत्तप्रबोधिनीची स्थापना करुन हिंदुराष्टाची कोनशिलाच बसविली असे म्हटल्यास
वावगे होणार नाही. शक्तिपातयोग आणि श्रीदत्तयोग यांची पताका श्रीकाकामहाराजांनी वैश्विक स्तरावर नेऊन
आजच्या तरुण पिढीलादेखील आश्चर्यात टाकले आहे .
कुळच अत्रि असल्याने असुयारहित(अनसुया)जीवनाची पवित्र परंपरा त्यांनी जीवापाड जपली, सांभाळली.
सद्गुरुंवरील पूर्ण निष्ठा,त्यांचे चरणी पूर्ण समर्पण, यामुळे श्रीकाकामहाराजांचे व्यक्तिमत्व आचारसंपन्नतेने
झळाळुन निघाले. श्रीस्वामीमहाराजांच्या अनुग्रहाने त्यांचे जीवनाला एक प्रकारे परीसस्पर्शच झाला. अंगभूत
असलेली दैवीगुणसंपत्ती अधिक प्रखर होऊन श्रीसद्गुरुचरणी विलसू लागली. नैष्ठीक ब्रम्हचर्य, नित्य अनुष्ठाने
परंपरा व शास्त्रसंमत आहारविहार, ऋषीमुनींनी स्वतःसिद्ध केलेल्या तत्वज्ञानाचे सखोल चिंतन आणि
स्वतःसिद्ध झालेल्या कुंडलिनी योगविद्येच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगिण उत्थानाची अहर्निश तळमळ हेच
त्यांचे जीवन बनून गेले होते .वार्याहाती चाले सज्जनाचे माप या संत तुकारामांच्या उक्तीप्रमाणे जीवनाचा
कायापालट घडवून आणणारा सिद्धयोग शनै शनै हळुहळु समाजाच्या सर्व स्तरात पोहचू लागला होता. भौतिक
सुविधांनी समाज परिपूर्ण झाला तरी त्यांचा परिणाम म्हणून असुरी प्रवृत्तीच जास्त बळावणार. अशा वेळी
सिद्धयोग हाच असुरी समाजाची अंतःकरणशुद्धी करण्याचा एक रामबाण उपाय महाराजांनी समाजापुढे ठेवला.
जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले।
तोचि साधु ओळखावा देव तेथेची जाणावा।।
या संत तुकारामांच्या अभंगाप्रमाणे श्रीमहाराज हे समर्थ साधु आणि देव होते. रंजल्यागांजल्यामध्ये तुकारामांना
देव दिसला. वाटेवरच्या उघड्या मुलामध्ये एकनाथांनी हरिजन म्हणजे देवाचा माणूस पाहिला. खरोखरच
,जीव आणि ब्रम्ह यांचे ऐक्य ज्यांना दिसते तेच साधु ...साक्षात्कारी पुरुष होत. सामान्य साधकाला
मलविक्षेपादी आवरणांमुळे याची जाणीव होत नाही. ती जाणीव करवून देण्यासाठी काकामहाराज.. बुडती हे
जन देखवेना डोळा या तळमळीने आस्तिकांच्या गोशाळांपासून धनिकांच्या महालांपर्यंतआणि झोपडपट्टीतील
अनाथ मनुष्यत्वापासून आदिवासींच्या पाड्यांपर्यंत अव्याहतपणे अखेरच्या क्षणापर्यंत तरुणांना लाजवेल अशा
उत्साहाने सिद्धयोगाचा प्रचारप्रसार करत राहिले. जगातील तत्वज्ञान परिषदा असोत किंवा जागतिक
शांततेसाठी प्रयत्न करणारे गट असोत, सामाजिक काम करणार्या सेवाभावी संस्था किंवा खेड्यांमध्ये
अखंडहरीनाम सप्ताह असोत ...काकामहाराज या प्रत्येक ठिकाणी सिद्धयोगाची माहिती, आचरण करण्यास
असलेला सोपेपणा आणि प्रत्येकाला येणारा अंतःकरण शुद्धीचा अनुभव या गोष्टी अत्यंत तळमळीने समजावून
देत राहीले. शांती आणि समानता सर्व जगामध्ये नांदावी आणि संकुचितपणाच्या सर्व शूद्र भिंती गळून ,पृथ्वी
हेच एक राष्ट् बनून जावे आणि वसुधैव कुटुंबकम ही हिंदू जीवनपद्धती वास्तवात यावी यासाठी जगाची
परिक्रमा करत राहिले ..! आणि जीवनाची परिक्रमा केवळ त्याग, शांती, गुणदोषरहीत पाहण्याची दृष्टी, दया,
क्षमा, तेज, धैर्य.. आदी गुणांच्या सहाय्याने त्यांनी पूर्ण केली.
हे सर्व त्यांना सहजपणे शक्य झाले ते त्यांच्या एका सद्गुणामुळे..तो म्हणजे जे काही आहे,होते आहे,ते ते सर्व
श्रीस्वामींचे आहे ..त्यांच्या कृपेने हे सर्व होते आहे.हा निश्चयात्मक अंतःकरणात दृढ झालेला पूर्ण श्रद्धाभाव..!!
साधारण मनुष्य आयुष्याच्या ज्या काळात शांत बसुन विश्रांती घेतो, त्या वयात श्रीकाकामहाराजांनी स्वतःच्या
प्रकृतीची पर्वा न करता प्रचारप्रसार करण्यातच धन्यता मानली, ती ह्रदयाची तळमळ म्हणजेच खरी श्रीगुरुसेवा
म्हणता येइल!! साधारण मानवमात्रासाठी असाधारण विद्या उपलब्ध करवून देण्याचा प्रयत्न एक असाधारण
महात्माच करु शकतो... कारुण्याचा आणि समष्टीच्या अभ्युदयाचा केवढा हा विशालपट आहे!!
दिक्षाधिकाराच्या दैवी अधिकारात आपल्या कारुण्यकृपेचे अमृत मिसळून ते अमृतकण सर्वांसाठी वाटणे हे
कृतार्थतेने आणि वात्सल्याने ओतप्रोत झाल्याशिवाय कुणाला करता येणार आहे? चैतन्याने ओतप्रोत भरलेले ते
एक देवलोकातील अस्तित्व होते ..आहेत..!!
तयांची आचरती पाउलें । पाऊनि सात्विकी श्रद्धा चाले। तो तेचि फळ ठेविले। ऐसें लाहे ।।
माऊली म्हणते अशा दैवी महात्म्यांच्या आचरणरुपी पाऊलांचा आदर्श आपल्या दृष्टीपुढे पथदिव्याप्रमाणे ठेऊन
जर शिष्यवर्ग सात्विक श्रद्धेने तसे आचरण खरोखरच करु लागला तर त्यांनाही तसेच फळ मिळणार हे
निश्चितच आहे ...पण हे सुक्ष्मतेने समजण्यासही त्यांची अहेतुकी कृपा हवी हेच खरे !
उत्तरायुष्यात श्रीकाकामहाराजांना सततच्या दगदगीमुळे अनेक कष्टदायक अशा आजारांना सामोरे जावे
लागले. अशाही अवस्थेत त्यांनी समाजाला हा मार्ग सहजपणे समजावा म्हणून पूर्वाभ्यास नावाची एक नविनच
संकल्पना प्रसारित केली. त्यात फक्त माहितीसह अनुभव देण्याचा प्रयत्न होता की ज्यामुळे व्यक्ती महायोग
मार्गाकडे लवकर वळु शकेल. प.पू.श्री काकामहाराजांना नेहमी वाटायचे की सर्व जगाला पटकन हा मार्ग कसा
कळेल? त्यासाठी त्यांनी पुणे केंद्राला वैश्विक महायोग संमेलन ही घ्यायला लावले. त्यावेळी अनेक देशांचे
प्रतिनिधी उपस्थित असताना महाराजांना झालेला आनंद हा अवर्णनीय होता. तो आनंद येवढ्यासाठी होता की
आपण सर्व जगाला श्रीस्वामी महाराजांचा मांगल्याचा निरोप देऊ शकलो!!
देवरुप होऊ सगळे या आगळ्यावेगळ्या ध्येयपथावर चालताना श्रीकाकांचे शरीर थकले होते .महात्म्यांच्या
पिढीतील एक मांगल्य श्रीस्वामींच्या चरणी विलिन होण्याच्या मार्गावर होते. अखेर ५ नोव्हेंबर २०१२ रोजी
संध्याकाळी श्रीस्वामींची आरती करुन श्रीस्वामींच्या चरणी ते परममंगल अस्तित्व विलिन झाले.
हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या त्यांच्या शिष्यवर्गाने त्यांना श्रीक्षेत्र नाशिक येथे पंचवटीच्या घाटावर
अखेरचा निरोप दिला..आणि त्यावेळी श्रीमहाराजांनी सर्व साधकांनाही एक निरोप दिला .. सर्वेपि सिद्धयोग
दिक्षितः भवन्तु.. हा संकल्प पूर्णत्वास नेण्याचे, माझे येवढे काम तुम्ही करा साधकांनो... आज या घटनेलाही
बारा वर्षे होऊन गेली..
...हे समस्तही श्रीवासुदेवो । ऐसा प्रतीतिरसाचा वोतला भावो । म्हणौनि भक्तामाजी रावो ।आणि ज्ञानिया तोचि ।। या ज्ञानेश्वर माऊलींच्या उक्तीप्रमाणे परब्रम्हाच्या प्रतितीरसाने ओतप्रोत असे प.पू.श्रीकाकामहाराज साक्षात परब्रम्ह आहेत..त्यांचे चरणी कोटी कोटी प्रणाम!! न गुरोरधिकं तत्वं न गुरोरधिकं तपः। न गुरोरधिकं ज्ञानं तस्मै श्रीगुरवे नमः ।।
हे समस्तही श्रीवासुदेवो ।
ऐसा प्रतीतिरसाचा ओतला भावो ।
म्हणौनि भक्तामाजी रावो ।
आणि ज्ञानिया तोचि ।।