श्री स्वामी गंगाधरतीर्थ महाराज म्हणजे शक्तिपात योगपरंपरेचा अगदी अलीकडचा अत्यंत दैदिप्यमान नंदादीप. या नंदादीपाने एकच ज्योत पेटवली नि दिव्य परंपरा प्रकर्षाने प्रकाशित होण्याचा समर्थ आशीर्वांद दिला. निवृतीनाथांनी एकच ज्ञानदीप पेटविला आणि सारे विश्व उजळून दिले, तीच भूमिका व तेच कार्ये स्वामी श्रीगंगाधरतीर्थांचे आहे.
स्वामीचे सारेच जीवन नंदादीपासारखे होते. अखंड प्रकाश देणारे, शांतता देणारे व प्रसनता देणारे होते. त्यांच्या जीवनात कुठेही धावपळ नाही. ये जा नाही.तीर्थयात्रा नाही. उग्र तपः साधनेचा खळखळाट नाही. जीवनाला प्रसिद्वीचा वारासुद्धा लागला नाही. अहंकाराच्या वाऱ्याची झुळूकही स्पर्श न झालेले स्वामींचे जीवन होते. हे सर्व खरे असले तरी एक गोष्ट चांगलीच खटकते ती ही की इतक्या उदात्त जीवनाचा काहीच पत्ता लागू शकत नाही.एवढ्या उत्तुंग जीवनाचे अल्पसे दर्शनही लौकिक अर्थाने घडू शकत नाही. असे झाले तरी शिष्याला काही कृतज्ञतेचे कर्तव्य रहातच असते, भले भगवंतानी स्वत:ला अदृश्य ठेवले, झाकून घेतले, म्हणून भक्ताला आपली वाणी बंद ठेवता येत नाही. कृतज्ञतेची जाणीव व्यक्त केल्याशिवाय त्याला समाधान होतच नाही. भगवंताच्या जेवढ्या स्वरूपाचे त्याला आकलन झाले असेल त्या स्वरूपाची पूजा करणे अनिवार्य आहे, अटल आहे. कदाचित ती पूजा पूर्ण स्वरूपाची असू शकणार नाही. षोडश उपचारांची असू शकणार नाही. पण भावपूर्ण असल्याशिवाय राहाणार नाही. त्याच भावपूर्ण मनाने आपण श्री गंगाधरतीर्थ स्वामीमहाराजांच्या जीवनाचे मनन करू या.
स्वामी महाराजांचे पूर्वाश्रमीचे नांव आणि जीवन बिलकुल उपलब्ध नाही.जीवनकाल म्हणाल तर साधारणपणे इ. स. १८४० ते १९०५ हा आहे. इतक्या अलीकडच्या काळात, विज्ञान युगात, व्यक्ती स्वत: ला पूर्णपणे झाकून घेऊ शकते आणि समाज त्यांना ओळखू शकत नाही हे आश्चर्य आहे, प्राचीन काळी तर असंख्य महापुरुष अज्ञात राहिले असतील यात नवल कसले! स्वामींचे मूळचे घराणे वाजपेयी ब्राह्मण शाखेचे होते. प्रभु रामचंद्रांच्या पुण्यपावन अयोध्या नगरीचे ते निवासी होते. गुरुदेव श्री वसिष्ठ मुनीनी रामचंद्राला शक्तिपातपूर्वक दीक्षा दिली त्याच परिसिरात, त्याच मातीत स्वामींचे बालपण गेले, गंगातुल्य शरयू नदीस्नानाने पुनीत झाले. स्वामींचे पूर्वाश्रमीय जीवन पूर्णपणे अज्ञात आहे. ते विवाहबद्ध झाले किंवा नाही ? व्यवसाय केला असेल तर कोणता ? नसेल केला तर काय केले असेल ? कौटुंबिक स्थिती कशी असेल ? ज्या कुलात या महापुरुषाचा जन्म झाला त्या कुलाची परंपरा, त्या कुलाचे दैवत- उपासना- कोणती असेल ? यातील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर केवळ मौनानेच देणे शक्य आहे.
एवढे मात्र खरे की स्वामीजींनी तरुणपणामध्ये घर सोडले, संसार सोडला आणि हिमालयाचा आश्रय घेतला. संन्यास घेण्यापूर्वीच हे घडले होते. विरक्त जीवनाची ओढ त्यांना संसारात ठेवू शकली नाही. यामध्ये व्यावहारिक संघर्ष काय झाले असतील ते न जाणे पण स्वामींच्या निश्वयी आणि शांत मनात मात्र संघर्ष झाला नसावा. हे असे करावयाचे हा सहज ठरविलेला निर्धार होता. आणि तो सुद्धा एकट्या स्वत: च्या मनाशीच.
विरक्त वृत्ती इतकी पराकोटीची होती की त्यांना इच्छा अशी कसलीच नव्हती. साधन संपन्न राहाण्याने सतत स्वरूपानुसंधान सुलभ साधते म्हणून साधन. हिमालयाची सिद्धभूमी त्यांच्या विरक्त अन्त:करणाला आकर्षून घेत होती, कुटुंबियांचे माया ममतेचे पाश स्वामींना रोखून धरू शकत नव्हते, विचलितही करू शकत नव्हते.
हिमालयात गंगाधरतीर्थांचा काही काळ गेला तेथे त्यांना दिव्यविभूती संन्यासीवेषात भेटली. त्या विभूर्तीने दिव्याविद्या गंगाधरतीर्थाना देऊन कृतार्थ केले, योग्य मार्गदर्शन करून ती विभूती अदश्य झाली.
ही घटना अलौकिक होती पण याचा उल्लेख यापेक्षा अधिक त्यांनी कधी केला नाही. आपला हिमालयातील उद्देश सफल झालेला पाहून गंगाधरतीर्थांनी परत फिरण्याचा बेत केला. ते परत घराकडे अयोध्येला न जाता जगन्नाथपुरीस गेले.संन्यास घेण्यासाठी ते गोवर्धन पीठात गेले, त्या ठिकाणी काही काळ मुक्काम करून त्यांनी विधिवत् संन्यास ग्रहण केला.
प. प. श्री गंगाधरतीर्थ स्वामी महाराज हे नाव या आश्रमाचा स्विकार केल्यानंतर प्राप्त झालेले आहे. या एकाच नावाचा परिचय आपणास झाला आहे. स्वामीमहाराज मितभाषी होते. गप्पागोष्टी, बोलणे, शास्त्र चर्चा, इ. त्यांना पसंत नसत.ते अत्यंत एकांतप्रिय होते. त्यांनी आपल्या भोवती शिष्यपरिवार वाढविला नाही. गोवर्धनपीठाच्या आश्रमातील गर्दी सुद्धा त्यांना नकोशी वाटें. आणि त्यासाठीच त्यानी जगन्नाथपुरीमध्ये चंदन तलावाच्या काठावर एक छोटीशी झोपडी बंधून तेथे त्यांनी आपले वास्तव्य कले. ते आपल्या झोपडीच्या बाहेर फारसे पडत नसत. भिक्षेसाठी स्वतः जात नसत. त्यांचेजवळ १/२ ब्रह्मचारी शिष्य होते. ते भिक्षा मागून आणीत आणि स्वामींची भिक्षा त्यातून होत असे, ते सतत साधनात रमलेले असत. त्यांनी आपला व्यक्तिगत परिचय कोणालाही करून दिला नाही व आपल्या अध्यात्म संपन्न जीवनाची जाणीव कोणालाही होऊ दिली नाही. लोक त्यांना अत्यंत साधा साधू म्हणून समजत. त्यामुळे त्यांचेकडे लौकिक अपेक्षेने कोणी गेलेच नाही. प. प. श्री गंगाधरतीर्थ स्वामीमहाराज म्हणजे परमशांतीचे नि सदाचार संपन्नतेचे मू्तिमंत प्रतिक होते. त्याग, ज्ञान आणि साधना यांनी त्यांच्या शरीराचा आश्रय घेतला होता. त्यावेळी श्री प. प. श्री गंगाधरतीर्थ स्वामीमहाराजांचे एकमेव शिष्य श्री नारायणतीर्थ स्वामी महाराज त्या झोपडीतून कृतार्थ होऊन बाहेर पडले व त्यामुळेच थोडेसे प्रकाशात आले.
श्रीगुरुदेव श्रीगंगाधरतीर्थ स्वामी महाराजांचे एकमेव शिष्य श्री नारायणतीर्थ स्वामी होत. त्यांचा अनुग्रह झाल्यानंतर काही काळ ते स्वामीजीच्या सान्निथ्यात राहिले. ते आपल्या घरी निघून गेल्यानंतर स्वामीजी पुनः तेच एकांत, शांत, प्रसिद्धिपराड्मुख जीवन व्यतीत करू लागले. महापुरुषाची महानता सामान्य राहाण्यातही असू शकते याचा हा सबळ पुरावाच म्हटला पाहिजे. महापुरुषांचे चरित्रही अत्यंत थोडे असते. देहासक्ति नाही, लोकेषणा नाही. स्वामीजी म्हणजे वैराग्याची चालती बोलती मूर्तीं. ती मूर्ती अशीच न कळत, आपल्या जाण्याची चाहूल कोणाला ही न देता आपत्या मूळ स्वरुपात विलीन झाली. पुढे शिष्याला जेव्हा जाग आली तेव्हा त्याने पत्राने चौकशी केली. परंतु तत्पूर्वींच श्रीगुरुदेवांचे लौकिक अस्तित्व चैतन्यात मिसळले होते. अनंतात विलीन झाले होते. हा काळ इ. स. १९०५ च्या सुमाराचा होता. आदिनाथ, परात्पर श्रीगुरुदेव, श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीगंगाधरतीर्थ स्वामी महाराजांचे चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात.